
कणकवलीत NRMU चा उत्साहपूर्ण मेळावा – संघर्षशील नेतृत्व, कामगार एकजूट आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव!
कणकवली येथे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या वतीने महामंत्री कॉम्रेड वेणू पी. नायर यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विविध विभागांतील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी महामंत्र्यांचा उत्स्फूर्त सत्कार करून आपल्या नेतृत्वावरील विश्वास व्यक्त केला. सहाय्यक महामंत्री कॉम्रेड जॉन ओमेन, कॉम्रेड कुमार घोसाळकर, उपाध्यक्ष कॉम्रेड कृष्णकुमार शेठ, विभागीय अध्यक्ष कॉम्रेड रमाकांत नाडकर्णी, विभागीय सचिव कॉम्रेड सचिन दिवेकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात NRMU च्या माध्यमातून मार्गी लागलेल्या कामगारांच्या प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. कोकण रेल्वेतील ऐतिहासिक संघर्ष, कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न आणि आगामी 8व्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर संघटनेची भूमिका यावर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे स्वर्गीय प्रा. मधु दंडवते यांच्या स्मृतिदिनानिमित्त कणकवली रेल्वे स्थानकात प्रवासी, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी वाचनालयाचे उद्घाटन. कामगारांच्या हक्कांसाठी संघर्ष करतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा स्तुत्य उपक्रम ठरला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात कॉम्रेड वेणू पी. नायर यांनी भावनिक शब्दांत सांगितले:
तुमचा विश्वास आणि तुमची साथ हीच माझी काम करण्याची खरी शक्ती आहे!”
प्रत्येक रेल्वे कर्मचाऱ्याच्या न्याय्य प्रश्नांसाठी, कोणताही भेदभाव न करता, NRMU सदैव ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कामगारांचा विश्वास हीच संघटनेची ताकद, एकजूट हीच संघर्षाची ऊर्जा आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणे हेच आमचे ध्येय!













