कोकण रेल्वे मध्ये अलीकडे झालेल्या मान्यताप्राप्त संघटनेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांच्या चारीमुंड्या चीत करत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने घवघवीत यश संपादन केले या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी तसेच कोकण रेल्वेच्या भविष्यातील वाटचालीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक 30/12/2024 रोजी दुपारी 11:30 वाजता खेड येथे सभेचे आयोजन केले होते.या मार्गदर्शन सभेसाठी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री कॉ. वेणु पी नायर तसेच कॉ. पुष्कर पाटील (अध्यक्ष ईसीसी बँक), कॉ. सुनील घोरपडे (उपाध्यक्ष ईसीसी बँक), कॉ. संदीप जाधव AIRF वर्किंग कमिटी मेंबर, कॉ. कुमार घोसाळकर, कॉ. सचिन दिवेकर, कॉ.रमाकांत नाडकर्णी, कॉ. भाई गुजर तसेच ईसीसी बँकेचे कोकण रेल्वेचे सर्व डेलिगेट उपस्थित होते. वरील सभेसाठी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या रत्नागिरी विभागातील कॉम्रेड लालम लाल होऊन बहुसंख्येने उपस्थित होते .महामंत्री कॉ. वेणू पी नायर यांनी कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक कॉ. मधू दंडवते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात केली. कॉ. सचिन दिवेकर यांनी त्यांच्या भाषणात निवडणुकीदरम्यान कोकण रेल्वेला भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यासाठी प्रमुख मुद्दा उपस्थित केला व महामंत्री कॉ. वेणु पी नायर यांना ठोस पावले उचलण्यासाठी कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वतीने आवाहन केले. कॉ. कुमार घोसाळकर यांनी त्यांच्या भाषणातून नॅशनल मजदूर युनियनच्या कार्यपद्धतीबद्दल सर्व कर्मचाऱ्यांना माहिती दिली. कॉ. पुष्कर पाटील यांनी ईसीसी बँकेच्या कामकाजाबद्दल सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्वांचे लाडके महामंत्री कॉ. वेणु पी नायर यांनी त्यांच्या भाषणातून सर्व कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले तसेच मान्यता प्राप्त संघटनेच्या निवडणुकीमध्ये रेल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जे सहकार्य केले त्याबद्दल देखील त्यांचे आवर्जून आभार मानले, तसेच महामंत्र्यांनी कोकण रेल्वेच्या पुढील वाटचालीबद्दल व कोकण रेल्वेच्या विलीनीकरणा बद्दल विस्तृत माहिती दिली व विलीनीकरणाबद्दल योग्य ते निर्णय घेऊ असे कर्मचाऱ्यांना सांगितले. त्याचबरोबर ईसीसी बँकेकडून कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2025 पासून कर्जवाटप सुरू करण्यात येईल अशी घोषणा केली, त्यानंतर कॉ. रमाकांत नाडकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी नियोजन पद्धतीने खेडच्या कॉम्रेडनी जी मेहनत घेतली त्यांचे विशेष आभार मानले. खेड स्थानकामध्ये इन्कलाब जिंदाबाद , लाल सलाम, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन जिंदाबाद , या घोषणाने सर्व परिसर दुमदुमून गेला होता आणि कार्यक्रमाची अशाप्रकारे सांगता झाली.





















